चला मुलांनो चलागम्मत गोष्टी वाचायला चला
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक
3:20 pm
यू ट्यूबवर मिळालेला हा एक मस्त व्हिडिओ. लहानपणापासून आपण ऐकत आलेली गोष्ट 'चल रे भोपळ्या टुणुक टुणुक' .
खुप छान अॅनिमेशन ने ही गोष्ट सादर केलेली आहे.
माझी मुलगी जुईली ( वय अडीच ) गोष्ट सांग म्हणले की एकदम सुरवात करते 'ए म्हाताले कुथे चाललीस मी तुला खाऊन टाकतो.'
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला -
2:19 pm
छोट्या दोस्तांचे आवडते बालगीत 'असावा सुंदर चॉकलेटचा बंगला' याची चित्रफीत युटयूबच्या सौजन्याने सर्वांसाठी.
अज्ञानाचा विंचू ( भारुड )
5:19 pmअगगगग SSSSS
काय झालं ग ?
विंचू चावला...
काय मी करु ? विंचू चावला
कुणाला सांगू ? विंचू चावला
विंचू चावला रे, विंचू चावला रे, विंचू चावला..हो !
निरक्षरतेचा विंचू चावला
सर्वनाशाचा घाम अंगाशी आला
त्याने माझा प्राण चालिला....अगगगग SSSSS विंचू चावला...!!
अज्ञान इंगळी अति दारुण
मज नांगी मारली तिनं
सर्वांगी वेदना जाण.... संकटाची
संकट कसलं संकट ?
हां हां म्हजी ते संकष्टी चतुर्थी का काय म्हणतात ते संकट
नव्ह नव्ह , ते संकट नव्ह !
मगं कसलं संकट?
शाहीर ... उदंड लेकुरे घरात झाली, रोगराई इथे पसरली,
शेते जमीन धुपून गेली, कर्जात सारी हयात सरली.
अगगगग SSSSS विंचू चावला...अज्ञानाचा विंचू चावला !!१!!
साथी: - या विंचवाला उतारा ?
शाहीर...... निरक्षरता दूर करा, शिक्षणाची कास धरा,
विंचू इंगळी उतरे झराझरा.
साथी:- विंचू इंगळी उतरेल म्हणजे काय होईल ?
शाहीरः ... अरे, सर्वनाशाच वीष उतरुन जाईल
घर नि परिसर स्वच्छ होईल, रोगराई पळून जाईल.
वाचायला येईल, लिहायला येईल, लिहायला येईल हो SSS
सावकाराला मग फसवता येणार नाही,
वेठबिगारीला लावता येणार नाही,
कर्जाचा डोंगर उरणार नाही.
मुलं नि बाळं सुखात राहतील,
घराचा गावाचा विकास होईल,
राष्ट्राची मग प्रगती होईल
बरं...बरं.....बरं
अज्ञानाचा विंचू उतरला,
निरक्षरतेचा विंचू उतरला,
सर्वनाशाचा विंचू उतरला ,
विंचू उतरला , विंचू उतरला , विंचू उतरला हो !!!
आजीबाई आजीबाई
4:24 pmचला चला करा घाई
नात म्हणतेय लवकर चला
खेळायला किंवा फिरायला चला
फुलपाखरांची भिरभिर पाहू या का?
पक्ष्यांची गाणी ऐकू या का?
झाडांमागे लपाछपी खेळू या का?
जाऊ ग आजी आणखी दूर
याहून लांब याहून दूर
पाण्यात पाय सोडून बसू या का?
माशांना पोहताना पाहू या का/
नावेतून फिरुन येऊ या का?
नको ग आजी याहून दूर
आणखी लांब जाऊ आणखी दूर
हत्तीवरती बसू या चल
वाघ -सिंह बघू या चल
सशांशी शर्यत लावू या चल.'
नको ग आजी याहून दूर
आणखी लांब जाऊ आणखी दूर
झुंई झुंई झुंई जाऊ या चल
देश विदेश फिरु या चल
गमती तिथल्या पाहू या चल
नको ग आजी याहून दूर
आणखी लांब जाऊ आणखी दूर
पृथ्वीभोवती गरगर फिरू या का?
चंद्रावरती उतरु या का?
चांदण्या तिथल्या आणू या का?
चंदेरी चंद्रावर जाऊ या चल
चांदण्या तिथल्या आणू या चल
चांदण्यांच्या ठिकर्या खेळू या चल
'चल चल आज्जी लवकर चल
'चल चल आज्जी लवकर चल चंदेरी चंद्रावर जाऊ या चल
गोष्टीच्या गावाला
1:27 pmजादूच्या चटईवर बसेन म्हणतो, गाव हिंडून बघेन म्हणतो.
वाघाशी मी शेकहँन्ड करीन,सिंहाला मी दोस्त बनवीन
लबाड लांडग्याला अद्दल मी घडवीन, कोल्हाची चतुराई पाहून येईन
गोष्टीच्या गावाला जाईन जाईन, खूप खूप मज्जा करीन करीन
भुताला मी भीती दाखवीन, चेटकिणीच्या झिंज्या ओढीन.
राक्षसाला ठोसा मारीन, जादुगाराचा पुतळाच बनवीन
गोष्टीच्या गावाला जाईन जाईन, तिथे मी गमती जमती करीन.
ससुल्याशी शर्यत लावीन, खारीसंगे झाडावर चढीन
काऊ-चिऊला गाणी शिकवीन, माकडाला घर बांधून देईन
गोष्टीच्या गावाला जाईन जाईन, खूप खूप मज्जा करीन करीन
म्हातार्या आजीला मदत करीन, कंजूष मारवाड्याची फजिती करीन
दुष्टांना मी धडा शिकवीन, शहाण्या मुलांना मी बक्षीस देईन
गोष्टीच्या गावाला जाईन जाईन, खूप खूप मज्जा करीन करीन
गाव हिंडून घरी मी येईन्,गुपचुप पलंगावर झोपी जाईन
सकाळी उठून शाळेत जाईन, गावातल्या गंमती सार्यांना सांगीन
गोष्टीच्या गावाला जाईन जाईन, खूप खूप मज्जा करीन करीन
एक होती चिमणी
12:53 pmअंगणात तिला दिसली राणी,
म्हणाली चिमणी,
'अग अग राणी
घे तुला लाल मणी,
दे मला दाणा-पाणी.'
चिमणीने राणीला मणी दिले
राणीने ताटलीत तांदूळ आणले
पेल्यामध्ये पाणी भरले
पायरीजवळ ठेवून दिले.
पिल्ले आली चटचट
दाणे टिपले पटपट
राणीने मण्यांची माळ केली
बाहुलीच्या गळ्यात घातली.
राणीची बाहुली नटून बसली
अंगणात मुले नाच - नाचली.
पावसा, पावसा
9:12 amतापलं अंगण निववून जा.
कीट - घाण धुवून जा.
नद्या - नाले भरुन जा.
शेते - राने भिजवून जा.
पिकांचं दान देऊन जा.
पावसा पावसा, येऊन जा
सार्यांना हसावून निघून जा.
जाता जाता, पावसा पावसा,
इंद्राचं धनुष्य ठेवून जा.
डिंग डिंग डिंगाक
10:38 amडींग डिंग डिंगाक, टिंग टिंग टिंगा
वारा घालतोय, पानात पिंगा
डिंग डिंगाक, टिंग टिंग टिंगा
कनकाच्या कमळात काळा काळा भुंगा
डिंग डिंगाक, टिंग टिंग टिंगा
पाण्यात पोहतोय, झिरझिर झिंगा
डिंग डिंगाक, टिंग टिंग टिंगा
डिंग डिंगाक, टिंग टिंग टिंगा
घरी जारे आता सारे,पुर झाला दंगा
तांबडवाडी
10:35 amझाडीत लपली तांबडवाडी.
तांबडवाडीचे तात्याराव,
ढढं ढोल नुसते ,खाबुराव.
तांबडवाडीच्या ताई अन् माई
नाचनाच नाचतात थई थय्यक थई.
तांबडवाडीच्या तांबुआज्जी
गोष्टी सांगताना तळतात भजी.
तांबडवाडीचे रस्ते लाल लाल
चालून याल तर मेंदी माखाल।
बागुलबुवा आला !
12:44 pmघाबरतो कोण त्याला?
आला तर आला
घेऊन जाईल आईला.
बागुलबुवा येऊन जा
आमच्या आईला घेऊन जा.
मग येईल मज्जाच मज्जा
धुणी भांडी मीच करेन
पाण्यामध्ये खेळत बसेन
भाजी चिरीन, कुकर लावीन
पोळ्या करुन जेवायला वाढीन.
नक्को नक्को दूधभात , पोळी नि तूप
गारेगार आईस्क्रिम खाईन मी खूप
दगड -मातीचे घर मी बांधीन.
दादाचे पुस्तक वाचायला घेईन
ताईच्या वहीवर चित्रे मी काढीन.
काचेच्या कपाटातली छानदार बाहुली
बघायची नुसती म्हणतात सगळी.
तिला काढीन, दूधभात भरवीन
न्हाऊ घालीन, थोपटूण निजवीन.
संध्याकाळी मी दमून गेल्यावर
कोण घेईल मला मांडीवर?
थोपटेल कोण म्हणून गाणी?
म्हणेल कोण ' नीज ग राणी !'
बागुलबुवा तू येऊ नको
आईला घेऊन जाऊ नको.
आलास जर इथे, मी खोटेच घाबरेन
आईच्या कुशीत शिरेन , लपून बसेन.
सफेद लाही
9:32 amकढईत चढला
इकडे धावला तिकडे धावला
चटचट चटचट
बोलायला लागला
पटपट पटपट
पळायला लागला
जोंधळ्याचा दाणा
बघता बघता
सफेद लाही
होऊन गेला।
---------------------------------
एका माकडाने काढले दुकान - विडिओ.
12:02 pmएका माकडाने काढले दुकान
आली गिर्हाईके छान छान !!!
छोट्या दोस्तांबरोबर मोठ्यांना ही आवडणारा हा आवडणारा हा व्हिडिओ. यू ट्यूब च्या सौजन्याने
परीचा गाव
3:46 pmस्वप्नांच्या राज्यात परीचा गाव
तिथली गंमत काय सांगू राव ?
तिथले चांदणे सोनेरी उबदार
उन मात्र तिथले शीतल गारगार
तिथे नाही चालायचे,नुसतेच उडायचे,
दिवसा घ्यायची झोप आणि रात्री खेळायचे.
शाळा नाही ,अभ्यास नाही ,ढगातून फिरायचे,
चंद्राच्या झुल्यावर झोके घ्यायचे.
आईस्क्रिमचे डोंगर नि थम्सअपची कारंजी,
कारंजात तरंगतात कांद्याची भजी
नदीतून गोडसे अमृत वहात असते,
काठावर गोळ्या चॉकलेट पडलेले असते.
सोन्याच्या झाडाला पाचुची पाने,
गोल गोल डाळिंबात माणकाचे दाणे.
'इतक्या छ्झ्झ्न गावातून परत का आला?'
त्याची सुध्दा झाली मजा सांगतो तुम्हाला.
डाळिंब खाताना दात तुटला रक्त आले.
खुप्, खुप दुखले तेंव्हा आई-बाबा आठवले.
आई नि बाबा तिथे खुप शोधले, परीच्या राज्यात कुठे नाही दिसले.
डोळे मिटून मग घरी परत आलो, आईच्या कुशीत झोपून गेलो।'
टिल्लू
9:34 pmपळता पळता धपकन पडते,पडता पडता भोकाड पसरते.
लगबग करता आई येते,उचलून तिला कडेवर घेते.
गोड गोड घेता साखरपापा, टिल्लूच्या सुरु होतात गप्पा
खेळायला जाईन म्हणते, चुकवून हिला,
तर माझ्याही आधी हिच्या पायात चपला.
माझेच पुस्तक हवे, वाचायला हिला,
आणि गृहपाठाची वही, रेघोट्या काढायला.
मैत्रीणींशी माझ्या बोलू देत नाही
बोलू देत नाही नि खेळू देत नाही
कस्सं होणार टिल्लूचं पुढं, मला मुळी कळतच नाही.
अश्शी आमची टिल्लू द्वाड,
पण सारे करतात तिचेच लाड.
दीदी दीदी म्हणत माझ्या गळी पडते
कुलू कुलू कनात, काही बाही बोलते,
आमच्या दोघींची एक गंमत असते
आई बाबांना ती सांगायची नसते.
टिल्लू मला खूप खूप आवडते
तिच्यासारखे शहाणे दुसरे कुणी नसते.
गरगर गिरकी
8:00 amगरगर गिरकी गोल गोल
सांभाळा आपला तोल तोल
गरगर फिरता फिरेल अंगण
फिरतील झाडे घालीत रिंगण
गरगर फिरवा त्यांना गोल
सांभाळा पण आपला तोल !!
गरगर फिरता फिरेल घरही
फिरेल ताई, फिरेल आई
भरभर फिरवा त्यांना गोल
सांभाळा पण आपला डोल!!
गरगर भरभर, भरभर गरगर
जमीन फिरवा, फिरवा अंबर
फिरु दे सारे भवती गोल
जाऊ द्या रे आपला झोल !!
अश्शी मज्जा सुट्टीची
8:56 amत्याला हवा होता दाणा.
बाळाने अंगणात टाकले दाणे
वेचायला आले खूप खूप चिमणे.
चिमण्यांनी टाकल्या लाल लाल चिंचा
म्हणाल्या मुलांनो,'खूप खूप वेचा.'
चिंचा टाकल्या खाऊन,
चिंचोके घेतले वेचून
खात खात चिंचोके
मुलांनी घेतले झोक्यावर झोके.
अश्शी मज्जा सुट्टीची
बाईंना सगळी सांगायची।
फूल म्हणाले
9:50 amजळत्या झळात
फूल फुलले
फुलताना हसले
हसताना म्हणाले
फुलत रहा
हसत रहा
आनंद भवती
उधळित रहा.
गात रहा.
खुशीत रहा।
अग अग सावली
9:19 amकाळी काळी भावली
माझ्यामागे लागतेस का?
जाईन तिथे मी येतेस का?
सारे कसे तुझे काळे?
हात पाय नाक डोळे.
फ्रॉकसुध्दा घालतेस काळाच का?
जाईन तिथे मी येतेस का?
तुझ्याकडे आहे का जादुची काठी?
कधी दिसतेस छोटी, कधी होतेस मोठी.
जादुची काठी तुझी मला देशील का?
सांग सांग मोठी मला करशील का?
चमकचांदणी
6:20 pmगाण्यात उतरली चमक चांदणी।
चमक चांदणी ये लवकर,
इवल्या मुठीत वार्याला धर।
वार्याला उधळ जाई-जुईवर,
अंगणात फुलांची पखरण कर।
अंगणात मुले नाचनाचली।
खेळायचं खूप आता सुट्टीच सुट्टी.
9:58 amखेळायचं खूप आता सुट्टीच सुट्टी.
खेळायचे घरी आता कॅरम आणि पत्ते
सार्या खेळात होईल माझीच फत्ते.
'अभ्यास करा,' अशी आता होणार नाही कटकट
टि.व्ही. बघताना कुणी करणार नाही वटवट।
पक्षांची गाणी एकत रहायचं.
खूप खूप फिरायचं.प्रवासाला जायचं
इतिहासातले गड किल्ले पाहून यायचं.
चित्रे बघायची.चित्रे काढायची.
टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवायची.
कधी-मधी कामात, आईला मदत सुध्दा करायची.
खाऊ मात्र रोज नवा, मागणी अशी हट्टाची.
अशी मज्जा, तश्शी मज्जा, मजेची सुट्टी.
खेळायचं खूप आता सुट्टीच सुट्टी।
विश्वमोहिनी
9:52 amआई,दे अक्षर वरदान, आम्हा दे अक्षर वरदान !! धृ !!
छंद लयीची पायी पैंजणे
अर्थांची नवनवी भूषणे
तव वदनातूनी ओंकाराचा उमटे घोष महान !! १!!
बहर कलांचे तुझ्याच ठायी
नवरस जीवन तुझीया पायी
तुझ्या स्वरांच्या अमृतस्पर्शे, विश्वा गवसे प्राण !!२!!
तू शुभदा गे संकटनाशिनी
तेजस्विनी तू तिमीरहारिणी
विहरसी जगती चैतन्य्ररुपिणी करित पुण्यप्रदान !!३!!